बुलेटसाठी एक लाख आणा, नाहीतर उपाशी राहा! २५ वर्षीय विवाहितेचा सासरकडून मानसिक-शारीरिक छळ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.

पुरंदर रिपोर्टर Live 

दौंड :प्रतिनिधि 

         पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरातून खळबळजनक घटना समोर आली आहे. बुलेट मोटरसायकल खरेदीसाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन ये, अशी वारंवार मागणी करत २५ वर्षीय विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सासू, सासरे, पती आणि दीरावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी वैष्णवी किरण मोरे (वय २५) या मूळच्या राहुरी तालुक्यातील टाकळी मिया येथील असून, सध्या पिंपरी-चिंचवडमधील वाल्हेकर वाडी येथे राहतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती किरण मोरे याने ‘माझ्यासाठी बुलेट घेण्यासाठी तुझ्या आई-वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये,’ अशी मागणी करत मानसिक त्रास दिला. याशिवाय शिवीगाळ आणि मारहाण केली.

ही बाब वैष्णवीने त्यांच्या सासू सुमन मोरे, सासरे सुरेश मोरे आणि दीर नितीन मोरे यांना सांगितली असता, त्यांनीही पतीची बाजू घेत तिच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. ‘तू एकुलती एक मुलगी असूनही तुझे वडील पैसे का देत नाहीत?’ असे म्हणत तिचा मानसिक छळ केला गेला. तिला उपाशी ठेवण्यात आले आणि मारहाणही करण्यात आली.

हा प्रकार ९ एप्रिल २०२० पासून २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालू होता. अखेर छळाला कंटाळून वैष्णवीने आपल्या वडिलांशी सल्लामसलत करून दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून सासू सुमन मोरे, सासरे सुरेश मोरे, पती किरण मोरे आणि दीर नितीन मोरे यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ८५, ५(२), ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.


🔴 नात्यांमध्ये विष कालवत चाललेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Post a Comment

0 Comments